सुखाचा चक्रव्यूह : पगार वाढला, सुख वाढल आहे का?

राहूल हरीभाऊ इंगळे पाटील
महिन्याची पहिली तारीख. मोबाईलची स्क्रीन उजळते आणि त्यावर संदेश येतो, “सॅलरी केडीटेड.” हा संदेश पाहताच चेहऱ्यावर क्षणभर आनंद येतो. बँक खात्यात आकडे वाढल्याचे पाहून आर्थिक स्थैर्य वाटते. पण हा आनंद फार काळ राहत नाही. लगेचच मनात खर्चाचं गणित सुरू होतं, घरभाडे आणि बँकेचा ईएमआय, मुलांची शाळा आणि ट्युशनची फी, महागाईमुळे वाढलेला किराणा, वीज बिल, वाहनाचं इंधन, विम्याचे हप्ते आणि क्रेडिट कार्डचं बिल. हे सगळं वजा केल्यावर महिन्याच्या शेवटी उरते एकच गोष्ट, शिल्लक रकमेबाबतची अनिश्चितता आणि पुन्हा पगाराची वाट पाहण्याची तीच जुनी चिंता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा सर्वात मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न असा आहे, पगार वाढला. पण सुख खरंच वाढलं का?आज भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाढते आहे. खरेदीशक्ती वाढते आहे आणि बाजारात उत्साह दिसतो आहे. अर्थतज्ज्ञ देशाच्या आर्थिक प्रगतीचे आकडे जेव्हा मांडतात, तेव्हा तो कागदावरील वाढ असतो. पण खरा प्रश्न असा आहे की, या आर्थिक वाढीचा फायदा सामान्य माणसाच्या घरात कसा पोचतो? जीडीपी देशाची एकूण कमाई दाखवतो, पण तो घरातील शांतता दाखवत नाही. देशाची खरेदीशक्ती वाढली म्हणजे प्रत्येक नागरिकाची आर्थिक स्वतंत्रता वाढलीच आहे असे नाही. अनेकदा आपण देश श्रीमंत होतोय का, की फक्त आकडे मोठे होत आहेत, हेच विसरतो. या समस्येच्या मुळाशी एक मानसशास्त्रीय आणि आर्थिक चक्र असते. याला ‘लाईफस्टाईल इन्फ्लेशन’ म्हणतात. जसा माणसाचा पगार वाढतो, तशा त्याच्या गरजा आणि अपेक्षा बदलतात. पगार वाढला की साधा फोन जाऊन महागडा स्मार्टफोन येतो. बाईकवरून गाडी घेतली जाते. लहान घर अपुरे वाटू लागते, म्हणून मोठ्या घरासाठी गृहकर्ज घेतले जाते. थोडक्यात सांगायचे तर, पगार वाढला की जीवनमान सुधारते असा आपला समज असतो. पण प्रत्यक्षात त्या जीवनशैलीची किंमत आणि तिचा आर्थिक भार अनेक पटींनी वाढतो.मानसशास्त्रात याला ‘हेडोनिक ट्रेडमिल’ किंवा सुखाचा चक्रव्यूह म्हणतात. आज आपण एखादी नवीन वस्तू खरेदी केली की आपल्याला खूप आनंद होतो. पण काही महिन्यांनी ती वस्तू आपल्यासाठी अगदी साधारण होऊन जाते. मग मानवी मन आणखी मोठ्या सुखाच्या शोधात धावते. काल ज्या गोष्टीला आपण आपले स्वप्न मानले होते, आज ती आपली गरज झाली असते. उद्या तीच गरज अपुरी वाटू लागते. आपण सुख विकत घेण्यासाठी वस्तू वाढवत जातो. पण आपले मन त्या वस्तूंशी जुळवून घेत, सतत धावत राहते.पगारवाढीच्या या शर्यतीत माणसाने पैसा कमावला, पण त्याने स्वतःचा मोकळा वेळ गमावला का? जास्त पगार म्हणजे मोठी जबाबदारी, जास्त ताण, जास्त कामाचे तास आणि सतत ऑनलाईन राहावे लागणे. जर वाढलेल्या पगारासोबत कुटुंबासाठी वेळच उरला नाही, तर त्या पैशाचा उपयोग काय? खऱ्या अर्थाने संपत्ती म्हणजे फक्त बँक बलेन्स नव्हे. संपत्ती म्हणजे पैसा, वेळ, आरोग्य आणि मानसिक शांतता यांचा मेळ. जर पैशासाठी वेळ विकावा लागत असेल, तर तो पगार नसून वेळेचा सौदा ठरतो.आज सोसायटीत फिरताना अनेक घरांमध्ये महागड्या वस्तू, गाड्या आणि सर्व सोयीसुविधा दिसतात. पण या वस्तूंपैकी किती वस्तू स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून घेतलेल्या असतात आणि किती कर्जावर घेतलेल्या असतात? घर आपल्या नावावर असते. पण महिन्याच्या शेवटी त्याची चिंता बँकेच्या नावावर असते. दिसणारी समृद्धी आणि खऱ्या आर्थिक सुरक्षितेत फरक असतो. अर्थव्यवस्थेची खरी स्थिती फक्त स्टॉक मार्केटच्या ग्राफमध्ये नसते. ती सामान्य कुटुंबाच्या किराणा पिशवीच्या वजनात आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला येणाऱ्या तणावात असते.पैसा हा जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्याला जगण्यासाठी सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य आणि निवडण्याचं स्वातंत्र्य देतो. पण पैसा एकटाच सुख देणारा किंवा शेवटची गोष्ट नाही. पगारवाढीची खरी परीक्षा पगाराच्या स्लिपवर होत नाही. ती महिन्याच्या शेवटी उरलेल्या पैशात, संचित बचतीत, कुटुंबासोबत घालवलेल्या निवांत वेळेत आणि मनाची शांतता यामध्ये दिसते. महिन्याची पहिली तारीख पुन्हा येते. मोबाईलवर पुन्हा मेसेज येतो. पण त्या संख्येच्या मागे माणसाला स्वतःसाठी वेळ, सुरक्षितता आणि समाधान मिळालं, तरच ती खरी समृद्धी ठरते. पगार वाढला म्हणून सुख वाढत नाही. पगारातून जगायला आणि माणसांसाठी मोकळा वेळ मिळाला, तरच खऱ्या अर्थाने सुख वाढतं.
